
नागपूर: राज्यातील विविध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारच्या अन्यायकारक निर्णयांविरोधात शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला समर्थन देत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानेही राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला असून, सर्व सभासद संस्थांना बंद ठेवण्याची सूचना पाठवण्यात आली आहे.
शिक्षक भरती पवित्र पोर्टलवर सुरू असून ती तात्काळ रद्द करण्याची, तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरती तातडीने सुरू करण्याची मागणी या आंदोलनामागील प्रमुख कारणे आहेत. याशिवाय, थकीत वेतनबाह्य अनुदान लवकरात लवकर देणे, शाळा व शिक्षण संस्थांच्या मालमत्ता करांची माफी, राज्यातील शाळांसाठी शासनाकडून सौर ऊर्जा प्रणाली बसविणे, तसेच आरटीई अंतर्गत थकीत रकमेची संपूर्ण प्रतिपूर्ती यांसारख्या अनेक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष रविंद्र फडणविस यांनी या सर्व प्रश्नांवर त्वरित निर्णय घेण्यासाठी शासनाने तातडीने बैठक बोलावावी व चर्चा घडवावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी शिक्षकांच्या हितासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासनाने लक्ष घालावे, असेही आवाहन केले आहे.
शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, या आंदोलनाद्वारे शासनाला त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष वेधता येईल आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या हितासाठी योग्य तो मार्गदर्शन मिळेल.









