
मुंबई – श्रीलंकेच्या दिशेने तयार होत असलेल्या चक्रीवादळ ‘डिट्वा’चा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला असून, राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे, तर हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ३ डिसेंबरपर्यंत आकाश ढगाळ किंवा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ ते ६ डिसेंबरदरम्यान हवामान स्वच्छ राहील, मात्र या कालावधीत तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
चक्रीवादळाचा जोर श्रीलंकेत जाणवत असला तरी त्याची किनारी परिणामरेषा भारतातही पोहोचत आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भाग ढगाळ राहतील. विशेषत: विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे.
हवामान खात्याने देशातील दक्षिणेकडील राज्यांसाठीही इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुद्दुचेरी आणि अंदमान-निकोबार बेटांवर पुढील ४८ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
डिट्वामुळे होत असलेल्या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात थंडीसह हलक्या पावसाचा अनुभव येऊ शकतो. दरम्यान, नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









