
नागपूर– नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर भरविण्यात आलेल्या ‘नागपूर पुस्तक महोत्सव 2025’ ला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत इतिहास रचला. अवघ्या नऊ दिवसांत साडेपाच लाखांपेक्षा अधिक वाचकांनी महोत्सवाला भेट देत हा उपक्रम मोठ्या यशस्वी ठरवला.
या पहिल्याच पुस्तक महोत्सवात देशभरातील 300 प्रकाशकांची तब्बल 15 लाख पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध होती. बालसाहित्य, संत साहित्य, विज्ञान, विविध लिपी-वाङ्मय, तसेच हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू भाषांतील पुस्तकांचे प्रचंड वैविध्य वाचकांसाठी विशेष आकर्षण ठरले. अनेक पुस्तकांवर सवलतीही देण्यात आल्याने महोत्सवात खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला.
‘झिरो माईल लिट फेस्टिवल’ अंतर्गत देशभरातील नामांकित लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, कायदे अभ्यासक, धोरणकर्ते यांच्या रोचक मुलाखती घेण्यात आल्या. ‘लेखक मंच’मध्ये नागपूर आणि विदर्भातील लेखकांची पुस्तके व त्यांच्याशी संवाद, तर ‘बाल मंडप’मध्ये मुलांसाठी स्पर्धा, कार्यशाळा, गोष्टी सत्रांची रेलचेल होती. पंधराशे मुलांनी पोस्टकार्डवर काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन, म्युरल आणि सेल्फी पॉइंटही प्रचंड लोकप्रिय ठरले.
नागपूरच्या नागरिकांनी दाखवलेल्या या एकदिलाने प्रतिसादाबद्दल बोलताना एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे म्हणाले, “हा महोत्सव आता नागपूरकरांचा स्वतःचा उत्सव बनला आहे.”
या भव्य प्रदर्शनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, राज्यमंत्री पंकज भोयर, आशिष जयस्वाल, अभिनेते गोविंदा, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन महोत्सवाचे विशेष कौतुक केले. अनेक आमदार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, तसेच विदर्भातील सर्व कुलगुरू आणि साहित्यक्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनीही उपस्थित राहून या उपक्रमाला भरभरून समर्थन दिले.
नागपूरकरांच्या उत्साही सहभागाने हा महोत्सव केवळ यशस्वीच नव्हे, तर सांस्कृतिक अभिमानाचा नवा अध्याय ठरला आहे.









