
नागपूर – शहरातील प्रसिद्ध मेयो रुग्णालयात एका महिला रेसिडेंट डॉक्टरने विभागप्रमुखावर छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रकरण समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पीडित डॉक्टर मेयो रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागात पीजी करत असून ती फेब्रुवारी २०२५ पासून येथे कार्यरत आहे. तक्रारीत म्हटले आहे की, विभागप्रमुख डॉ. मकरंद सूर्यकांत व्यवहारे हे अनेक महिन्यांपासून तिच्यावर अश्लील टिप्पण्या करत असल्याचे, अयोग्य वर्तन करत असल्याचे आणि मानसिक दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे की, आरोपी डॉक्टर विनाकारण तिला आपल्या केबिनमध्ये एकटीला बोलवायचे आणि अश्लील वागणूक द्यायचे. तिने अनेक वेळा विरोध दर्शवूनही आरोपीने तिचे म्हणणे न मानता गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्याचेही सांगितले जाते.
यासंदर्भात महिला डॉक्टरने अखेर त्रासाला कंटाळून तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छेडछाड आणि धमकीसंदर्भातील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर मेयो रुग्णालयासह वैद्यकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.









