
नागपूर – राज्यातील ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ताज्या आदेशावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महायुती सरकारने २७ टक्के ओबीसी आरक्षण देण्याचा मोठा दावा केला होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हा मुद्दा पुन्हा अनिश्चिततेत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वडेट्टीवार म्हणाले की, ज्या ठिकाणी एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेवर थेट परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुका स्थगित ठेवण्याची शक्यता निर्माण होते आणि यामुळे ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
सरकार फक्त घोषणाबाजी करत असून प्रत्यक्षात ओबीसी समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. त्यांनी सरकारला जबाबदारीने निर्णय घेण्याचे आणि ओबीसी समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.









