
4नागपूर : शहराच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने राबवत असलेल्या “ऑपरेशन शक्ती” मोहिमेअंतर्गत अजनी परिसरात मोठी कारवाई केली. एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहव्यापाराचा रॅकेट उद्ध्वस्त करत पोलिसांनी दोन महिलांना अटक केली, तर एका तरुणीची सुटका करण्यात आली. पुढील तपासासाठी सर्वांना अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, ही कारवाई अजनी रोडवरील मेडिकल कॉलेजसमोर असलेल्या क्लासिक अंबर अपार्टमेंटमधील “एक्सोटिक स्पा अँड सॅलून” येथे करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाला येथे देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुष्टि केल्यानंतर एका बोगस ग्राहकाला पाठवून सापळा रचला.
त्या ग्राहकामार्फत एका महिलेसोबत 6 हजार रुपये व्यवहार निश्चित करण्यात आला. महिला ठरलेल्या खोलीत पोहोचताच पोलिसांनी धाड टाकून तिला आणि दोन आरोपी महिलांना पकडले. अटक झालेल्यांची नावे प्रतिमा मंगेश बडगे आणि किरण दयालू उके अशी आहेत.
तपासात उघड झाले की, प्रतिमा स्पाची संचालिका असून किरण उके रिसेप्शनवर आर्थिक व्यवहार सांभाळत होती. प्रतिमा यापूर्वीही देहव्यापाराच्या प्रकरणात पीडिता म्हणून सापडली होती. त्यानंतर ती रायपूरला गेली आणि तिथे पुन्हा या धंद्यात सक्रिय झाली. त्याच दरम्यान तिची ओळख सध्या सुटवण्यात आलेल्या पीडित तरुणीशी झाली. तिला जास्त पैसे मिळतील असा भुलावा देत तिने तिला नागपुरात आणले आणि स्पा सेंटरमध्ये कामाला लावले. ही तरुणी रायगढ येथील असल्याचे समजते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक परिस्थितीमुळे ती या चक्रात अडकली होती. छाप्यात दोन मोबाईल फोन, सीसीटीव्ही डीव्हीआर, पेन ड्राईव्ह आणि रक्कम मिळून सुमारे 27 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, हे स्पा सेंटर मागील पाच महिन्यांपासून सुरू होते. दोन्ही आरोपी महिलांवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अजनी पोलिस अधिक तपास करत आहेत.









