
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेत आज महत्त्वाचा दिवस ठरला. सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई हे नुकतेच निवृत्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा करणारी अधिसूचना नोव्हेंबरच्या सुरुवातीला जारी केली होती.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे मूळ हरियाणातील हिसार येथील मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित आहे. १० फेब्रुवारी १९६२ रोजी जन्मलेल्या सूर्यकांत यांनी आपल्या कारकिर्दीत पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण निकाल दिले. २०१८ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्या संतुलित, संवेदनशील आणि धारदार न्यायनिर्णयांच्या शैलीमुळे ते देशभरात ओळखले जातात.
नवीन सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत यांचा कार्यकाळ २४ नोव्हेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२७ असा असेल. त्यांच्या नेतृत्वात सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती, प्रलंबित खटल्यांचे व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या संवैधानिक मुद्द्यांवरील सुनावणी अधिक वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. देशातील न्यायव्यवस्थेच्या पुढील दिशेसाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नेतृत्व किती प्रभावी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









