
नागपूर: नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या नऊ दिवसीय नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 अंतर्गत आयोजित ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चा पहिला दिवस ज्ञान, संवाद आणि साहित्यिक उत्साहाने उजाळून निघाला. उद्घाटन सत्रानंतर चार नामवंत पत्रकार व लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, सर्व वक्त्यांनी तरुणांना—“भरपूर पुस्तकं वाचा आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व सक्षम करा”—असा प्रेरणादायी संदेश दिला.
आवड आणि जिद्द असली तर काहीही शक्य — नितीन गोखले
पत्रकार, लेखक आणि भारतशक्ती डॉट कॉमचे संस्थापक नितीन गोखले यांची मुलाखत रविशंकर मोर यांनी घेतली. 1987 च्या रिलायन्स क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान नागपूरमध्ये केलेल्या रिपोर्टिंगच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही क्षेत्रात नाव कमवण्यासाठी आवड, जिद्द आणि शिस्तच सर्वात महत्त्वाची.
सोशल मीडियावरील माहिती शेअर करताना “चेक, क्रॉसचेक आणि डबल चेक” करण्याचा आग्रह धरत त्यांनी युवकांना देशाच्या सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात योगदान द्या आणि भारताचा अभिमान बाळगा, असा संदेशही त्यांनी दिला.
रामायण, महाभारत वाचा— अक्षत गुप्ता
‘द हिडन हिंदू’ ट्रायलॉजीचे लेखक, पटकथाकार व गीतकार अक्षत गुप्ता यांची मुलाखत आरजे आमोद देशमुख यांनी घेतली. भारतीय इतिहास आणि परंपरांवरील कथा ऐकून मोठे होताना आजच्या पिढीला त्याची माहितीच नाही, हे जाणवल्यावर लेखनाची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले.
“इंग्रजी शिकणे आवश्यक आहे, पण आपल्या संस्कृतीची उदाहरणे, चित्रे वापरून ते शिकवले गेले पाहिजे,” असे ते म्हणाले.
युवकांना उद्देशून गुप्ता म्हणाले.“रामायण, महाभारत, इंडिया, कुराण यांसारख्या ग्रंथांचे वाचन तुम्हाला अधर्म आणि असत्याला चोख उत्तर देण्याची ताकद देते.”
भारत प्राचीन काळापासून ज्ञानाचा महासागर — प्रशांत पोळ
लेखक आणि विचारवंत प्रशांत पोळ यांच्या मुलाखतीत भारताच्या गौरवशाली व्यापार, स्थापत्य आणि शिक्षण परंपरेचा वेध घेण्यात आला. तक्षशिला विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत, तसेच भारताचा व्यापार रोमन साम्राज्यापासून चीनपर्यंत चालायचा, याची त्यांनी अनेक उदाहरणांनी उपस्थितांना खात्री दिली.
“भारतीय मालाची गुणवत्ता जगभर मान्य होती. आजही योग, आयुर्वेद, भारतीय खाद्यसंस्कृती आणि सिनेमांबद्दल प्रचंड आकर्षण आहे,” असे पोळ यांनी सांगत भारत पुन्हा विश्वगुरू होणारच, असा विश्वास व्यक्त केला.
काळ बदलला तसे माध्यमेही बदलली — सरिता कौशिक
एबीपी माझा चॅनलच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत पत्रकार अंकिता देशकर यांनी घेतली. समाजाच्या बदलत्या मान्यता, स्वहिताचा वाढता कल आणि सोशल मीडियामुळे बदललेली पत्रकारिता यावर त्यांनी सविस्तर बोलले.
“बातम्यांचा भडिमार होत असताना विश्वसनीयता हा सर्वात मोठा मुद्दा बनला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. कोविड काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणांचे संकलन असलेल्या ‘अनमास्किंग इंडिया’ या पुस्तकाचे संपादन करताना आलेले अनुभव त्यांनी शेअर केले.
‘साधो बँड’ने कार्यक्रमात रंगत भरली-
फ्यूजन, फोक, सुफी आणि वेस्टर्न संगीताचा सुंदर मेळ साधत ‘साधो बँड’ने सायंकाळी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कबीरवाणीपासून मराठी लोकसंगीतापर्यंत सर्व शैलींचे दिलखुलास सादरीकरण करत त्यांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली.










