
गोंदिया — गोंदिया नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना दिलेला संदेश चर्चेत आला आहे. आज गोंदियातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटेल यांनी मतदारांना स्पष्ट इशारा दिला. “उमेदवारांची कुंडली पाहूनच मतदान करा; चुकीचा निर्णय घेतला, तर भविष्यात नगर परिषद बिकण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.”
पटेल यांनी मागील कार्यकाळातील गैरव्यवहारांवर टीका करताना सांगितले की, काही लोकांनी बोगस स्टॅम्प तयार करून गंभीर गैरकृत्ये केली आहेत. काहींचा ढाई वर्षांचा कारभार जनतेसमोर पारदर्शकपणे उघडा पडला आहे, त्यामुळे मतदारांनी योग्य-अयोग्य याचा विचार करूनच मताधिकार वापरणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रफुल पटेल म्हणाले की, गोंदियासाठी पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती घराघरांत पोहोचवा आणि पूर्ण ताकदीने निवडणुकीत झोकून द्या.
त्यांनी स्पष्ट केले की, योग्य निवड झाली तर गोंदिया पुढे जाईल, पण चुकीचा निर्णय शहराला पुन्हा मागे खेचू शकतो.
गोंदिया परिसरात पटेल यांच्या या इशाऱ्याची आता मोठी चर्चा सुरु असून, निवडणुकीचे वातावरण आणखी तापले आहे.









