
नागपूर: शिक्षण विभागातील शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून बनावट ड्राफ्ट तयार करत बोगस शैक्षणिक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन काढून शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी नागपूर शहर पोलिसांच्या सायबर ठाण्यात दाखल गुन्ह्यात तीन नवीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तपास करत असून तपासाची घोडदौड सुरू आहे.
फिर्यादी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या तक्रारीवरून अप. क्र. 24/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 318(4), 338, 336(3), 340(1), 340(2), 61(2), 238 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील 66(क) सह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आत्तापर्यंतच्या तपासात विभागीय शिक्षण उपसंचालक 3, शिक्षणाधिकारी 3, वेतन अधीक्षक 1, लिपिक 6, शाळा मुख्याध्यापक 3, शाळा संचालक 2 आणि सहाय्यक शिक्षक 3 असे एकूण 21 जणांना अटक करण्यात आली होती.
तपासादरम्यान मिळालेल्या नवीन माहितीनुसार खालील तीन आरोपींनी स्वतःसाठी बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाकडून वेतन मिळवले असल्याचे निष्पन्न झाले.
1. जगदीश दिनकरराव ढेंगे (35) कनिष्ठ लिपिक, चरणदास प्रायमरी स्कूल, नागपूर
2. हेमंत यशवंत धकाते (35) कनिष्ठ लिपिक, जगन्नाथ पब्लिक स्कूल, भांडेवाडी
3. अक्षय संजय गांडे (31) कनिष्ठ लिपिक, विद्या विकास उच्च प्राथमिक शाळा, वाठोडा ले-आऊट
या तिन्ही आरोपींनी संबंधित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, उपसंचालक आणि वेतन अधिकारी यांच्याशी संगनमत करून बनावट शालार्थ आयडी निर्माण केल्याचे SIT च्या तपासात स्पष्ट झाले आहे. या बनावट आयडींचा वापर करून त्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली.
सायबर पोलिसांनी दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सदर तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीअम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









