
मुंबई – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा कालक्रम-
१६ नोव्हेंबर रोजी गावातील विजय संजय खैरनर (२४) या नराधमाने चिमुरडीवर प्रथम अत्याचार करून तिचे डोके दगडाने ठेचत अत्यंत क्रूरपणे हत्या केली. माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतलं.
जेव्हा मुलीचा मृतदेह तिच्या घरात आणण्यात आला, तेव्हा गावात हळहळ, आक्रोश आणि संतापाचे वातावरण पसरले. कुटुंबीयांसह सर्वच गावकरी हतबंब राहिले.
प्राथमिक तपासात काय समोर आलं?
तपासात समोर आलं की आरोपीचे मुलीच्या वडिलांसोबत सुमारे महिनाभरापूर्वी वाद झाले होते. त्याच रागातून त्याने अल्पवयीन मुलीवर सैतानी कृत्य करत तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अटकेनंतर न्यायालयाने आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे तसेच सरकारी वकील उज्वल निकम यांना खटल्यासाठी नियुक्त करण्याचे आश्वासन दिलं आहे.
लासलगावमध्ये संतापाचा मूक मोर्चा-
या क्रूर घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने शांततेत पण ठाम भूमिका घेत मूक मोर्चा काढला. शिवाजी चौकातून पोलिस ठाण्यापर्यंत काढलेल्या मोर्चात महिलांसह सर्व समाजबांधवांनी सहभागी होत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
मोर्च्यादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन देण्यात आले. तसेच ऑल इंडिया पँथर सेना यांनीही स्वतंत्र निवेदन देत आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली.









