
भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन, नॅशनल बुक ट्रस्ट आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “नागपूर पुस्तक महोत्सव 2025” चे २२ ते ३० नोव्हेंबर २०२5 दरम्यान रेशीमबाग मैदान येथे भव्य आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने घेण्यात आलेल्या अनोख्या पोस्टकार्ड चित्रकला आणि रेखाटन उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
‘पुस्तक आणि वाचक’ या विषयात आधारित या उपक्रमात शहरातील आणि राज्यातील विविध महाविद्यालये व शाळांमधील १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत अतिशय सुंदर अशी चित्रे पोस्टकार्डवर चितारली. यात त्यांनी वाचनाचे महत्त्व, पुस्तकांची जादू आणि ज्ञानविश्वाचे विविध पैलू कलाकृतीतून प्रभावीपणे मांडले.
या उपक्रमात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट (मुंबई), शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय (नागपूर), नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, नागपूर फाईन आर्ट कॉलेज, श्री कला महाविद्यालय (वर्धा), वसंत चित्रकला महाविद्यालय (हिंगणघाट), तसेच नागपूरमधील पंडित बच्छराज विद्यालय, श्री निकेतन माध्यमिक शाळा, दुर्गनगर माध्यमिक शाळा, विनायकराव देशमुख माध्यमिक शाळा, कल्याण मूकबधिर विद्यालय, द अचिव्हर्स स्कूल, जैन इंटरनॅशनल स्कूल, इरा इंटरनॅशनल स्कूल आणि सेंटर पॉईंट इंटरनॅशनल स्कूल या संस्थांसह एकूण १५ ते २० शाळा-महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावे, त्यांचे कलेशी आणि पुस्तकांशी नाते दृढ व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे झिरो माईल युथ फाउंडेशन संचालक प्रशांत कुकडे, समय बनसोड, कल्याण देशपांडे यांनी म्हटले आहे.









