
नागपूर : मानव तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत सोशल सिक्युरिटी ब्रांच (SSB) आणि AHTU क्राईम युनिटच्या पथकाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत वाठोडा परिसरातील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
१७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० ते रात्री १० वाजताच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारोडी गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीत, सिंबायोसिस कॉलेजजवळ हे रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासात आरोपी आर्थिक लाभाचे आमिष दाखवून एका महिलेला देहव्यापारात ढकलत असल्याचे समोर आले.
कारवाईत शंकर गणेशराव वानखेडे (३८) आणि स्वाती उर्फ मयुरी वानखेडे (३४, दोघेही रहिवासी – ज्योतीनगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही संबंधित इमारतीत भाड्याने राहत होते. पथकाने घटनास्थळावरून एका पीडित महिलेची सुटका केली.
छाप्यात दोन मोबाईल फोन (किंमत ₹२०,०००), व्यवहारात वापरलेले ₹१,५०० आणि चार सीलबंद कंडोम असा एकूण ₹२१,५४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वैद्यकीय तपासणीनंतर आरोपी आणि सुटका केलेली महिला यांना पुढील चौकशीसाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील मानव तस्करी आणि लैंगिक शोषणाच्या जाळ्यांचे उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.









