
मुंबई – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत होत असलेल्या अडचणींमुळे आणि अनेक भागांतील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ई-केवायसीची अंतिम तारीख आता १८ नोव्हेंबरऐवजी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती देत सांगितले की, सध्या अनेक महिलांना ओटीपी मिळत नसल्याने प्रक्रिया अपूर्ण राहत होती.
महिलांच्या आधारशी जोडलेल्या क्रमांकावर एक आणि पती किंवा वडिलांच्या आधारवर नोंद असलेल्या क्रमांकावर दुसरा ओटीपी येणे आवश्यक असल्यामुळे अडचणी वाढल्या होत्या. काहींचे मोबाईल हरवणे, दस्तऐवज नष्ट होणे किंवा कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्यानेही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नव्हती. या समस्या लक्षात घेऊनच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा त्या घटस्फोटित आहेत, त्यांनी ई-केवायसीसोबत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचा दाखला किंवा न्यायालयाचा आदेश सादर केल्यास त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सरकारचा उद्देश कोणतीही पात्र महिला तांत्रिक कारणामुळे योजनेपासून दूर राहू नये, हा असल्याचे सांगण्यात आले.
ई-केवायसीसाठी अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, वाढवलेल्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.










