
नागपूर : शहरातील इमामवाडा परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली आला आहे. कुख्यात गुन्हेगार ताराचंद्र नत्थुजी खिल्लारे आणि त्याच्या टोळीने नागरीकांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात इमामवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी विजेता राजकुमार कैथवास यांच्याही संलग्नतेचा आरोप सुभाष उके यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
फिर्यादी सुभाष सुधाकर उके, रा. इमामवाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजता खिल्लारे टोळीतील आरोपी सुभाष उके यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. आरोपींनी घरात तोडफोड करत मारहाण केली तसेच त्यांच्या चारचाकी वाहन (एमएच 40 बीई 7280) वरही हल्ला केला.
उके यांनी तात्काळ इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली; मात्र आरोपींपैकी एक पोलीस कर्मचारी असल्याने तक्रार स्वीकारण्यात आली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या उके यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
व्याजाच्या पैशांवरून हल्ला-
उके यांच्या मते, त्यांनी विजेता कैथवास यांच्याकडून 35 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यांनी 3 लाख रुपये परतफेड करूनही आरोपींनी पुन्हा 1 लाख रुपये मागणी केली. तो पैसा न दिल्याने हल्ला घडवून आणण्यात आला. खिल्लारे टोळी इंदिरा नगर आणि रामबाग परिसरात अशाच पद्धतीने लोकांना धमकावून, जबरदस्ती वसुली करून, घरांवर कब्जा करण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून अन्यायाचा आरोप-
उके यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्र. 574/2025 नोंदविण्यात आला असला, तरी नंतर त्यांच्याच विरोधात खोटा गुन्हा (क्र. 576/2025) दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांचा दावा आहे.
वरिष्ठांकडे तक्रार, तरीही धमक्या सुरू-
सुभाष उके यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार दिली असून, आरोपींकडून अजूनही धमक्या मिळत असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी पुढील गंभीर मुद्दे मांडले –
– “तक्रार मागे घे, नाहीतर परिणाम भोगशील,” अशा धमक्या.
– नागपूरातील “मोठ्या लोकांकडून” दबावाचे फोन.
– “मी उपमुख्यमंत्र्यांचा पी.ए. बोलतो,” असा धमकीचा कॉल
– पत्नी आणि मुलावर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आणि त्या वास्तवात आल्या.
पत्रकार परिषदेत उके परिवाराची मागणी-
सुभाष उके यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे आणि माध्यमांकडे न्याय व संरक्षण मिळावे, तसेच प्रकरणातील सत्यता उघड व्हावी अशी मागणी केली.
त्यांनी सांगितले की, “इमामवाडा पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळावा.”
जोडलेले पुरावे-
– दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस आयुक्तांना दिलेले निवेदन
– 9 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेली नोटीस
दरम्यान प्रकरणात नागरिकांनी पोलिसांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. तर नागपूरमधील कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.










