
नागपूर : तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणातील आरोपी भाजपमध्ये दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. “भाजप आता माफिया प्रवृत्तीच्या लोकांसाठी सत्तेचा दरवाजा उघडून बसली आहे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीत जमीनअस्मानाचा फरक आहे. भाजपचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत,” असा टोला पटोले यांनी लगावला.
भाजपची नीच पातळीवरील राजकारण-
नाना पटोले म्हणाले, “भाजप आज महाराष्ट्रात अशा लोकांना पक्षात घेत आहे, ज्यांचा थेट गुन्हेगारीशी संबंध आहे. सत्तेच्या मार्गावर पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड ही पक्षाला मान्य आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्रात ही भावना निर्माण झाली आहे की, आपले राज्य कुठे नेले जात आहे?”
पत्रकार सुद्धा आता यावर खुलेपणाने बोलत आहेत, असेही ते म्हणाले. “भाजप आज राजकारणाचा नीचतम स्तर गाठत आहे. लोकशाही, नैतिकता आणि पारदर्शकतेचा चेहरा दाखवत मागच्या दाराने माफियांना संरक्षण देत आहे,” असा घणाघात पटोले यांनी केला.
भाजपची वॉशिंग मशीन आता सर्वांनाच दिसतेय-
पटोले यांनी पुढे म्हटले, “भाजपने विधानसभा अधिवेशनात नाशिकच्या एका माफियावर आरोप केले होते, पण नंतर त्यालाच पक्षात घेतले. आता स्वतः भाजपचेच काही नेते म्हणत आहेत की त्यांच्या पक्षात भ्रष्ट लोकांना ‘वॉशिंग मशीन’मध्ये धुतले जाते.”
शरद पवारांवरही टीका-
याचबरोबर पटोले यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही काँग्रेस तोडण्याचा आरोप केला होता. पार्थ पवार संदर्भात बोलताना त्यांनी म्हटले होते, “भाजप आणि त्यांचे सहकारी मिळून काँग्रेसला कमकुवत करण्याचा कट रचत आहेत. पण आम्ही मागे हटणार नाही. २०२९ मध्ये आम्ही जिंकू आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवू.”
सरकार स्वतःच चौकशी करतंय, मग निष्पक्षता कुठे?
पुणे प्लॉट घोटाळ्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, “मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की प्रकरण गंभीर आहे, मग सरकार स्वतःच्याच अधिकाऱ्यांकडे चौकशी का सोपवतंय? जर सरकारला खरंच धाडस असेल, तर ही चौकशी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे दिली पाहिजे.”
त्यांनी पुढे आरोप केला की, “भाजप मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करणाऱ्या लोकांना वाचवत आहे. त्यामुळे त्यांना नैतिकतेची भाषा बोलण्याचा अधिकार नाही.










