
नागपूर – प्रेमसंबंध तुटल्यानंतर महिलेशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी रिअल इस्टेट व्यवसायिक अजय लाखनकर (५५, रा. बेसा) याच्याविरोधात छेडछाड, धमकी आणि अभद्र वर्तनाचे गुन्हे दाखल केले आहेत.
३८ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची ओळख अजय लाखनकर यांच्याशी वर्ष २०१८ मध्ये झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र, महिला विवाहित असल्याचे सांगत तिने नकार दिला. त्यावर अजय म्हणाला, “पुरुषांना दोन पत्नी नसतात का?” असा प्रश्न विचारला.
यानंतर अजयने तिला आपल्या घरी नेऊन पत्नी व मुलांशी ओळख करून दिली. कालांतराने दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात त्यांच्यात शारीरिक संबंधही आले आणि महिला गर्भवती झाली. अजयने तिला गर्भपात करायला भाग पाडले. त्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले आणि अखेर ते तुटले.
काही काळानंतर अजयने तिला अश्लील संदेश पाठवण्यास, शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ५ नोव्हेंबर रोजी तो महिलेच्या घरी गेला, तिला हात धरून ओढण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर त्याने गलिच्छ शिवीगाळ केली आणि जीव मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पसार झाला.
पीडितेच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी अजय लाखनकरविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.










