नागपूर : शहरातील गंगाबाई घाट रोडवरील ‘एमएच मोटर्स’ या वाहन विक्रेत्या संस्थेने नागरिकांना कमी किमतीत दुचाकी आणि चारचाकी वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमारे २९.८८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची नावे फिरोज हामिद खान पठाण (३०, सुभाननगर), वाहिद आलम (३५, हसनबाग), मोहम्मद सरफराज मोहम्मद शकील (२५, रनाळा) आणि जय कुखे (कॉटन मार्केट) अशी आहेत.
रजा रियाज खान पठाण (२९, लकडापुल) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये एमएच मोटर्सकडून वाहन खरेदी करताना त्यांनी ७.५० लाख रुपये डाउन पेमेंट दिले होते. मात्र, तपासात उघड झाले की आरोपींनी फायनान्स कंपनीकडे अत्यल्प रक्कम दाखवून उर्वरित पैसे गिळंकृत केले. शिवाय, वाहनाच्या पुढील हप्त्यांची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले असले तरी ते पूर्ण करण्यात आले नाही.
अशा प्रकारे १६ ग्राहकांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सरफराजला अटक करून चौकशी सुरू केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी केली आहे.या घटनेमुळे कमी किमतीत वाहन मिळवून देणाऱ्या संशयास्पद कंपन्यांबाबत नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.









