
नागपूर : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू अलीकडे अनेक मंचांवर एकत्र दिसत असल्याने महाविकास आघाडीत मनसेचा प्रवेश होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, काँग्रेसने या चर्चांना पूर्णविराम देत मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर स्पष्ट भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, “मनसे हा काँग्रेसचा समविचारी पक्ष नाही. त्यामुळे त्यांना आघाडीत सामील करण्याचा कोणताही विचार नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या काही आठवड्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठींमुळे दोघांच्या युतीच्या शक्यता वाढल्या आहेत. मात्र, या युतीचा व्याप फक्त मुंबई महापालिकेपुरता मर्यादित राहील की राज्यातील इतर स्थानिक निवडणुकांपर्यंत वाढेल, हे अद्याप निश्चित नाही.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की मनसेने मुंबईतील २२७ पैकी तब्बल १२५ प्रभागांवर आपली ताकद ओळखून रणनीती आखली आहे. माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, घाटकोपर आणि विक्रोळी यांसारख्या मराठी मतदारबहुल भागांतून पक्षाचे उमेदवार मैदानात उतरतील, अशी तयारी मनसेने केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला मात्र शिंदे गटाकडून मोठा फटका बसल्याने महापालिकेतील स्थानिक पातळीवर नव्याने ताकद उभी करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे काही राजकीय निरीक्षकांच्या मते, ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक ही शिवसेनेच्या अस्तित्वासाठी गरजेची ठरू शकते.
मात्र, वडेट्टीवारांच्या स्पष्ट विधानानंतर काँग्रेसने मनसेला आघाडीत स्थान देण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे राज ठाकरेसोबत स्वतंत्र लढाई लढतात का, की आघाडीचा वेगळा पर्याय शोधतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










