
नागपूर : ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ च्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी स्वरांची, भक्तीची आणि उत्साहाची मेजवानी अनुभवली. लोकप्रिय गायक विशाल मिश्रा यांच्या ‘आज गली गली नागपूर सजायेंगे… राम आएंगे’ या गीताने संपूर्ण पटांगण दुमदुमले आणि तरुणाईच्या हृदयावर त्यांनी अक्षरशः राज्य केले.
हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर शनिवारी रात्री झालेल्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’साठी हजारोंचा जमाव उसळला होता. मैदान हाऊसफुल झाल्याने बाहेरही प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती.
“मी लहान घरातून मोठी स्वप्नं पाहिली… मी तुमच्यातलाच आहे, आणि माझा प्रत्येक स्वर तुम्हाला अर्पण आहे,” असे सांगत विशाल मिश्रा यांनी चाहत्यांना भावनिक केले. त्यांच्या सुमधुर गाण्यांनी – ‘तू पहला पहला प्यार है मेरा’, ‘क्या मुझे प्यार है’, ‘मैं चाहूँ तुझको बेपनाह’ – यांसारख्या हिट गाण्यांनी तरुणाईच्या मनात रोमांच निर्माण केला.
विशालच्या सुरांनी जनता मंत्रमुग्ध –
लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान वातावरणात जयजयकाराचे स्वर घुमले. मंचावरून खाली उतरल्यावर लहान मुलांनी त्यांच्या भोवती उत्साहाने गराडा घातला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, अॅड. सुलेखाताई कुंभारे आणि महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात झालेल्या गीता पठण विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र रेणू अग्रवाल आणि मनोज तत्ववादी यांनी नितीन गडकरी यांना प्रदान केले.
नागपुरात एक लाख क्षमतेचे स्टेडियम व्हावे- नितीन गडकरींची अपेक्षा
कार्यक्रमांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत नितीन गडकरी म्हणाले,
“नागपूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग हा या महोत्सवाच्या यशाचा खरा पुरावा आहे. परंतु जागेअभावी अनेकांना कार्यक्रम पाहता येत नाही. त्यामुळे नागपुरात भविष्यात एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारले जावे, अशी माझी इच्छा आहे.”
त्यांनी गीता पठणाच्या तीन विश्वविक्रमांबद्दल सर्व शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हा महोत्सव शहराला मिळालेला सुंदर उपहार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फडणवीस म्हणाले, “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरसाठी एक सुंदर उपहार आहे. स्थानिक कलावंतांना मंच देतानाच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांची कला पाहण्याची संधी नागपूरकरांना मिळते. गीतेचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम यशस्वी झाल्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो.
महोत्सवाच्या यशामागील मेहनती टीम-
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, जयप्रकाश गुप्ता, प्रा. राजेश बागडी, हाजी अब्दुल कदीर, संदीप गवई, रेणुका देशकर, गुड्डू त्रिवेदी, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान नागपूरकरांचा उत्साह, कलाकारांची कला आणि आयोजकांची मेहनत यामुळे ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ ची दुसरी रात्र अविस्मरणीय ठरली.









