
नागपूर : जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजीचा स्फोट झाला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उमेदवार निवड बैठकीवर आता थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या दूतांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “ही बैठक अवैध आणि असंवैधानिक आहे,” असा जाहीर ठपका प्रदेश प्रभारी वीरेंद्र जगताप यांनी ठेवतच बैठकस्थळावरून संतप्तपणे निघून गेले.
शहरातील गणेशपेठ काँग्रेस कार्यालयात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गटबाजीचं नाट्य उफाळलं. केदार, सांसद श्याम बर्वे, माजी मंत्री राजेंद्र मुलक, जिल्हाध्यक्ष अश्विन बैस आणि इतर वरिष्ठ नेते उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. पण काही वेळातच जगताप, अशोक बोबडे आणि उदय मेघे बैठकस्थळी दाखल झाले आणि त्यांनी ठणकावलं. “प्रदेशाध्यक्षांनी नेमलेल्या समितीला वगळून घेतली जाणारी ही बैठक पूर्णपणे अवैध आहे. काही मोजके लोक पक्षाच्या नावावर स्वतःचा अजेंडा राबवत आहेत.”
ही घोषणा होताच वातावरण तापलं. प्रभारी बैठक सोडून बाहेर पडले, पण केदार समर्थकांनी उमेदवारांच्या मुलाखती सुरूच ठेवल्या. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये थेट ‘केदार गट विरुद्ध सपकाळ गट’ असा संघर्ष स्पष्ट दिसू लागला आहे.
केदार विरुद्ध सपकाळ : सत्तासंघर्षाचा नवा अंक-
जिल्हा काँग्रेसमध्ये सुनील केदार यांच्या एकहाती कारभारावर पूर्वीपासूनच नाराजी होती. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून वाद झाले, तर रामटेकमध्ये त्यांनी काँग्रेसविरोधी उमेदवाराला पाठिंबा दिल्याचंही बोललं गेलं. आता पुन्हा उमेदवार निवड प्रक्रियेत त्यांचा दबदबा दिसल्याने सपकाळ समर्थक गट आक्रमक झाला आहे.
मात्र, केदार समर्थकांचं म्हणणं वेगळं “ज्यांचं स्वतःचं जनाधार नाही, तेच गटबाजीचं रडगाणं गात आहेत. केदार यांच्या नेतृत्वाखालीच जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला.”
सपकाळ यांची ‘एकजुटी’ची हाक निष्फळ?
राज्याध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकत्याच नागपूर भेटीत काँग्रेसला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. पण काही दिवसांतच गटबाजीचा हा स्फोट झाल्याने त्यांची ‘एकजुटीची हाक’ धुळीत मिळाल्यासारखी दिसते.
नेत्यांचे प्रत्युत्तर-
अश्विन बैस (जिल्हाध्यक्ष) म्हणाले, “बैठकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं होतं. काही आले नाहीत, म्हणजे गटबाजी नाही. सर्व काही नियमानुसार झालं.”
तर वीरेंद्र जगताप (प्रभारी) यांनी पत्रकारांना सांगितलं, “घडलेलं खरं आहे, पण मी काही बोलणार नाही. आम्हाला प्रदेशाध्यक्षांनीच गटबाजी थांबवण्यासाठी पाठवलं होतं.स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेली ही गटबाजी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. नागपूर काँग्रेस पुन्हा एकदा ‘गटात’ अडकली आहे.










