
नागपूर : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ८ हजारांहून अधिक मुस्लिम मतदारांचे नाव मतदार यादीत दोन-दोन, तीन-तीन ठिकाणी असल्याचा दावा राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत शेलारांवर धर्म आणि जातीयतेच्या आधारावर मतदारांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतील अनियमितता आणि मतदानात फेरफार झाल्याच्या आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजप जिंकलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या यादीत असल्याचा दावा केला होता. ठाकरे यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना मंत्री आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदारांच्या नावांची पुनरावृत्ती झाल्याचा आरोप केला. त्यातच त्यांनी उत्तर नागपुरात तब्बल ८ हजारांहून अधिक मुस्लिम मतदारांचे ‘डुप्लिकेट’ नाव असल्याचा दावा केला.
शेलारांच्या या वक्तव्यानंतर केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे म्हणणे आहे की, मतदार यादीतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून, निष्पक्ष निवडणुका होणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
मात्र, काँग्रेसने शेलारांवर तीव्र निशाणा साधला आहे. डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले की, “भाजप निवडणूक फायद्यासाठी समाजात विभागणी निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत आहे. धर्माच्या आधारावर मतदारांना लक्ष्य करणे हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.”
राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन शेलार यांच्या भ्रामक आणि भडकाऊ वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.









