नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेत २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा केली. याशिवाय १५ नवीन नगरपंचायतींचाही समावेश करण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी पार पडेल. अर्ज भरायला १० नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून, १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांद्वारे एकूण २८८ सदस्यांची निवड होणार आहे. आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला निवडणुकीसंबंधी तयारी तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घोषणेनंतर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या काही आठवड्यांत राज्यातील राजकीय तापमान वाढवणार आहेत.









