
मुंबई : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आदिती तटकरे यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे.”
या योजनेअंतर्गत राज्यातील महिला लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी स्वरूपात दिले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून E-KYC प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे निधी वितरणात विलंब झाला होता. अनेक महिलांनी OTP न मिळाल्याच्या तक्रारी केल्या होत्या.
यावर तत्काळ दखल घेत आदिती तटकरे यांनी सांगितले की, आता E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर करण्यात आली असून, तांत्रिक त्रुटी दूर केल्या आहेत.
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, 19 नोव्हेंबरपर्यंत E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. या प्रक्रियेसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” जुलै 2024 पासून लागू करण्यात आली असून, अल्पावधीतच या योजनेने महाराष्ट्रातील महिलांमध्ये विश्वास आणि सक्षमीकरणाची भावना निर्माण केली आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी हा ऑक्टोबरचा हफ्ता दिवाळीपूर्वीचा मोठा दिलासा ठरणार आहे.









