
नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या अद्वितीय खेळाने रविवारी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण दिला. आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या ‘वुमन इन ब्लू’ संघाने आपल्या जोश, जिद्द आणि संघभावनेने भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
खेळातील ठिणगी :
भारताने प्रथम फलंदाजी करत २९९ धावांचे मजबूत लक्ष्य उभे केले. शफाली वर्माची ८७ धावांची झंझावाती खेळी आणि दीप्ती शर्माचे पाच बळी यांनी सामन्याचा कल भारताकडे वळवला. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या आशा अमनजोत कौरच्या झेलाने संपुष्टात आणल्या आणि भारताने ऐतिहासिक विजयोत्सव साजरा केला.
१४ वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक भारतात!
२०११ मध्ये मुंबईत पुरुष संघाने विश्वचषक जिंकून देशभर जल्लोष साजरा केला होता. आता त्याच शहरात १४ वर्षांनी महिलांनीही तोच पराक्रम करून भारताला अभिमानाचा मुकुट मिळवून दिला. या कामगिरीमुळे भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर पुरुष व महिला दोन्ही विश्वचषक जिंकणारा तिसरा देश ठरला आहे.
देशभरात आनंदाचा स्फोट :
विजयानंतर रस्त्यावर जल्लोष, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव, आणि प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी दिसली. घराघरात जणू दुसरी दिवाळीच उजळली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक :भारतीय महिला संघाने दाखवलेली एकजूट, चिकाटी आणि जिद्द अप्रतिम आहे. हा विजय भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.खऱ्या अर्थाने आज महिलांनी दाखवून दिलं.मैदानावर आणि मनात, दोन्ही ठिकाणी भारत विजेता आहे.








