Published On : Thu, Oct 30th, 2025
By Nagpur Today Nagpur News

बच्चू कडूंच्या आंदोलनाला तात्पुरता विराम; मुख्यमंत्री फडणवीसांशी उद्या मुंबईत करणार चर्चा!

Advertisement

नागपूर : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला आता मोठं वळण मिळालं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी सुरु केलेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी तीव्र झालं होतं. नागपूर-हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या धरला होता, तर अनेक ठिकाणी चक्का जाम करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु, आज झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाला तात्पुरता विराम देण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या दोन मंत्र्यांनी बच्चू कडू आणि शिष्टमंडळाशी चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उद्या (३० ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता मुंबईत निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह, वीज बिल माफी, शेतीमालाच्या हमीभाव, तसेच दुष्काळग्रस्त भागांसाठी मदतीच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

बच्चू कडूंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की,आमचा लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. उद्याच्या बैठकीत जर समाधानकारक निर्णय झाला, तर आम्ही आंदोलनाचा विचार पुन्हा करू. पण जर सरकारने दुर्लक्ष केलं, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको आंदोलन उभारलं जाईल.”

Gold Rate
06 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,28,300 /-
Gold 22 KT ₹ 1,19,300 /-
Silver/Kg ₹ 1,80,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, सध्या आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी, राज्यातील हजारो शेतकरी बच्चू कडूंसोबत ठामपणे उभे आहेत. नागपूर, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा दिसून आला.

राज्यातील राजकीय वर्तुळातही या घडामोडींबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण ही बैठक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाचा निकाल ठरवणारी ठरू शकते.

दरम्यान शेतकऱ्यांचा श्वास सध्या या बैठकीवर अडकला आहे.कारण निर्णय सकारात्मक आला, तर त्यांचा दिलासा; अन्यथा महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाच्या उंबरठ्यावर उभा राहू शकतो.

 

Advertisement
Advertisement