
नागपूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन 28 ऑक्टोबरपासून सुरू असून आज दुसऱ्या दिवशी ते अधिक तीव्र झालं आहे.
या ठिय्या आंदोलनामुळे प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली आहे. न्यायालयाने बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतरही बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की,जेलमध्ये टाका, पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, सरकार आमच्यावर दडपशाही करतंय.
यावेळी त्यांनी “साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दांची औलाद आहे!” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी इशारा दिला की,जेल कमी पडेल, आम्ही तयार आहोत अटकेसाठी, आता रामगिरीही ताब्यात घेऊ.
दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाची प्रत बच्चू कडू यांना दाखवली असून, प्रशासन परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्क आहे. नागपूरमधील हा आंदोलनाचा परिसर पोलिस बंदोबस्तात असून, शेतकरी आणि प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणावाचं वातावरण आहे.











