
पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन उभारलं असून, त्यांनी रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांततेचा सल्ला देत सांगितलं की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवादाद्वारे तोडगा निघू शकतो, पण लोकांना व रुग्णांना त्रास होईल असं आंदोलन योग्य नाही.”
फडणवीस म्हणाले, “सरकारकडून आंदोलनाच्या आधीच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात आम्ही बच्चू कडूंना सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून शक्य त्या गोष्टींवर निर्णय घेऊ असं सांगितलं होतं. त्यांनीही सुरुवातीला होकार दिला होता. मात्र, नंतर त्यांनी मध्यरात्री संदेश पाठवून बैठकीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं, त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली.”
ते पुढे म्हणाले, “आजही बावनकुळे साहेबांनी बच्चू कडूंशी संपर्क साधलेला आहे. परंतु आंदोलकांकडून रस्ते अडवण्यात येत असल्याने नागरिकांना आणि रुग्णांना प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर रुग्णवाहिका अडल्याच्या आणि वेळेवर उपचार न मिळाल्याच्या घटना मांडल्या आहेत. त्यामुळे अशा स्वरूपाची आंदोलने टाळावीत, असं माझं स्पष्ट मत आहे.”
फडणवीस यांनी इशारा दिला की, अनेकदा अशा आंदोलनांमध्ये काही असामाजिक घटक शिरतात आणि हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रेल रोको किंवा रास्ता रोको करून वातावरण बिघडवणं हे राज्यहिताचं नाही. सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करण्यास तत्पर आहे.
ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मदतीसाठी या सरकारने ₹३२ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. आम्ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देत आहोत. सध्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालं आहे, त्या शेतकऱ्यांना आधी मदत देणं आवश्यक आहे. नंतर कर्जमाफीवरही विचार केला जाईल.”
शेवटी फडणवीस म्हणाले, सरकार संवादासाठी तयार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र बसून मार्ग शोधावा. आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, संवादातूनच तोडगा निघतो.










