
मुंबई : यंदाच्या दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विक्रमी उत्पन्नाची नोंद केली आहे. अवघ्या दहा दिवसांत एसटीने तब्बल ₹३०१ कोटींची कमाई केली असून, यामध्ये पुणे विभागाने ₹२० कोटी ४७ लाखांच्या उत्पन्नासह राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर धुळे (₹१५.६० कोटी) आणि नाशिक (₹१५.४१ कोटी) विभागांनी स्थान पटकावले आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
१८ ते २७ ऑक्टोबर या दिवाळीच्या १० दिवसांच्या कालावधीत एसटीने दररोज सरासरी ₹३० कोटींचे उत्पन्न मिळवत एकूण ₹३०१ कोटींची कमाई केली. विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर रोजी परतीच्या प्रवासादरम्यान एसटीने एका दिवसात तब्बल ₹३९ कोटी ७५ लाख रुपये मिळवत या वर्षातील सर्वाधिक दैनंदिन उत्पन्नाचा विक्रम केला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाच्या उत्पन्नात ₹३७ कोटींची वाढ झाली असून, हा प्रवास एसटीसाठी उत्साहवर्धक मानला जात आहे. प्रवाशांचा ओघ वाढल्याने आणि सुट्ट्यांमधील विशेष फेऱ्या यामुळे या यशात मोठा वाटा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र, मंत्री सरनाईक यांनी हेही स्पष्ट केले की, एप्रिल आणि मे वगळता मागील चार महिने एसटी तोट्यात चालली आहे. अवकाळी पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे जून ते सप्टेंबरदरम्यान तब्बल ₹१५० कोटींचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात दिवाळी हंगामातून उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
ऑक्टोबरसाठी ₹१०४९ कोटींचे उत्पन्न लक्ष्य निश्चित करण्यात आले असले तरी, काही दिवस वगळता हे लक्ष्य पूर्णपणे साध्य होऊ शकले नाही. पुणे, बीड, अमरावती, बुलढाणा या विभागांनी उत्कृष्ट कामगिरी करत गेल्या वर्षीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले, तर सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि धाराशिव विभागांची कामगिरी मात्र अपेक्षेपेक्षा कमी राहिली.
या संदर्भात सरनाईक म्हणाले, “तोट्यात असलेल्या विभागांचे मूल्यमापन करून सुधारणा उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. सर्व विभागांनी कार्यक्षमतेने आणि नियोजनपूर्वक काम केल्यास एसटी पुन्हा नफा दाखवू शकेल.”
दिवाळीच्या काळात प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक करत “प्रवाशांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी काम करणं हीच खरी सेवा,” असंही सरनाईक यांनी नमूद केले.










