
नागपूर,: शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण असल्याने नागपूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत मनपाच्या ११६ शाळांमध्ये १३६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपरी असल्याने शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागपूर महानगरपालिकेच्या ११६ शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर महानगरपालिकेने या उपक्रमासाठी आपल्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मनपाच्या एकूण ११६ शाळांमध्ये हे कॅमेरे बसवले जातील, ज्यात ८८ प्राथमिक शाळा आणि २८ माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यापूर्वी ३४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर आता लवकरच उर्वरित ८२ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यातील ३६ प्रायमरी शाळात २५६ सीसीटीव्ही कॅमेरे तर ४६ अपर प्रायमरी शाळेत ४९६ सीसीटीव्ही कॅमेरे व ३४ हायस्कूल मध्ये ६०८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे.
या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपवले जाईल. याव्यतिरिक्त, महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील कॅमेऱ्यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रीय कार्यालयातून मनपा शाळांच्या सुरक्षा उपायांची नियमितपणे माहिती घेतली जाईल. यामुळे शाळेच्या परिसरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडण्यापूर्वीच त्यावर प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि चिंतामुक्त शिक्षण वातावरण तयार करण्याच्या दिशेने मनपाचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.










