नागपूर : एमआयडीसी परिसरात संशयित प्रेमसंबंधाच्या वादातून एका पतीने आपल्या पत्नीची लोखंडी फावड्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर शंकर प्रधान (वय ३१) आणि त्याची पत्नी रिंकी किशोर प्रधान (वय २३) हे नागपूरमधील पंचशील नगर येथे वास्तव्यास होते. रिंकीचा एका व्यक्ती करण नावाच्या तरुणाशी जवळचा संबंध असल्याचा संशय किशोरला होता. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असत. अनेक वेळा समज देऊनही रिंकीने त्या व्यक्तीशी संपर्क ठेवला, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
रविवारी दुपारी सुमारास १.३० वाजता, किशोरने रिंकीला पुन्हा करणशी मोबाईलवर बोलताना पाहिले. संतापाच्या भरात त्याने जवळच असलेले लोखंडी फावडे उचलून रिंकीच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत किशोरने तिला लगेच लता मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी उपनिरीक्षक संजय बन्सोड यांच्या तक्रारीवरून मिडीसी पोलिस ठाण्यात आरोपी किशोर प्रधान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.








