मुंबई : राज्य सरकारच्या लोकप्रिय योजनांवर पुन्हा एकदा बंदीची छाया दिसू लागली आहे. एकेकाळी गरीब आणि सामान्य जनतेसाठी ‘आनंदाचा शिधा’ ही योजना म्हणजे सणासुदीचा दिलासा ठरत होती. परंतु, यंदा गणेशोत्सव आणि दिवाळी दोन्ही सणांपूर्वीही या योजनेचा काही ठावठिकाणा नाही. त्यामुळे ‘शिवभोजन थाळी’प्रमाणेच ‘आनंदाचा शिधा’ही इतिहासजमा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सणासुदीच्या काळात गोरगरीब कुटुंबांना घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. फक्त 100 रुपयांत एक किलो चणाडाळ, साखर, रवा आणि एक लिटर खाद्यतेल असा किट लाभार्थ्यांना दिला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याचे वितरण ठप्प झाले आहे.
2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांदरम्यान मोठ्या प्रमाणात किटचे वितरण करण्यात आले होते. 2024 मध्ये अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानेही या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, यंदा गणेशोत्सव आणि दिवाळी या दोन्ही सणांपूर्वी सरकारकडून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने, योजना थंड बस्त्यात गेली असल्याचे स्पष्ट होत आहे.
मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘आनंदाचा शिधा’ या भागात तरी दिलासा ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही प्रशासनाकडून एकही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, ‘महायुती’ सरकारच्या कार्यकाळात अनेक योजनांचा गाजावाजा झाला होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीअभावी अनेक योजना अडचणीत आल्याची चर्चा आहे. ‘शिवभोजन थाळी’, ‘तीर्थाटन योजना’, ‘लाडकी बहीण योजना’ यांसह अनेक योजनांसाठी आर्थिक पुरवठा बंद झाल्याने त्या प्रत्यक्षात बंदच झाल्याचं वास्तव दिसतंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणतीही योजना बंद झालेली नसल्याचं सांगितलं असलं तरी जमिनीवरील परिस्थिती वेगळीच चित्र दाखवते. सध्या ‘सरकारी तिजोरीत खडखडाट’ असल्याची चर्चा रंगत असून, ‘आनंदाचा शिधा’ योजनेलाही गंडा बसणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरत आहे.