नागपूर: २१ सप्टेंबर, जागतिक अल्झायमर दिनानिमित्त भाऊसाहेब मूळक आयुर्वेद महाविद्यालय, नंदनवन आणि ‘विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम २६ सप्टेंबर रोजी पार पडला.
कार्यक्रमाला मान्यवर पाहुणे म्हणून विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वसंतराव कळंबे, राजेश आंबुलकर आणि महिला अध्यक्षा श्रीमती अरसपुरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. युवराज काळे होते. कायचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. सी. एस. तनम, तसेच स्वस्थवृत्त विभागाच्या प्रमुख डॉ. माधवी रेहपाडे आणि इतर सर्व विभाग प्रमुखही उपस्थित होते.
शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, हाडांची घनता तपासणी (Bone Mineral Density Test), ECG, मोफत औषधे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याची सोय करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
अल्झायमर हा वृद्धावस्थेत होणारा स्नायविक विकार असून त्यात स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयक्षमता घटणे, दैनंदिन कामकाज विसरणे आणि व्यक्तिमत्त्वात बदल होणे ही लक्षणे दिसतात. पूर्ण उपचार नसला तरी योग्य जीवनशैली, आयुर्वेदिक उपाय, योग आणि वेळेवर निदान यामुळे आजाराचे दुष्परिणाम कमी करता येतात.
याद्वारे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अल्झायमर विषयी जनजागृती करण्यास आणि आयुर्वेद व योगाच्या साहाय्याने निरोगी वृद्धत्व साध्य करण्यास मदत झाली.