नागपूर: शिक्षण आणि मेहनत या दोन आधारस्तंभांवर यशाची उंच भरारी घेता येते, याचा प्रत्यय नागपूरच्या अरुषी दीक्षित हिने दाखवून दिला आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉची विद्यार्थीनी असलेल्या अरुषीने एलएलएम (क्रिमिनल लॉ विषय) २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात विद्यापीठाच्या मेरिट यादीत स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अरुषी दीक्षित ही जिल्हा व सत्र न्यायाधीश अनुराग दीक्षित यांची कन्या असून, तिला कुटुंबाकडून शिक्षणात नेहमीच प्रोत्साहन मिळाले. आपल्या यशाचे श्रेय अरुषीने वडील अनुराग दीक्षित, आई, भाऊ तसेच महाविद्यालयातील मार्गदर्शक प्राध्यापक श्री. एस.एम. राजन आणि प्राध्यापिका पल्लवी भावे यांना दिले आहे.
तिच्या सातत्यपूर्ण परिश्रम, प्रामाणिकपणा आणि विषयातील अभ्यासू वृत्तीमुळे हे यश शक्य झाल्याचे अरुषी सांगते. “माझ्या कुटुंबीयांनी मला सदैव प्रेरणा दिली. अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. हेच माझ्या यशाचं खरं कारण आहे,” असे अरुषीने नमूद केले.
सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉमध्ये अरुषीच्या या यशाचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, सहाध्यायी आणि शिक्षकवर्गाकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कायदा क्षेत्रात अरुषी पुढे जाऊन समाजासाठी सकारात्मक कार्य करेल, असा विश्वास प्राध्यापकांनी व्यक्त केला.
नागपूर विद्यापीठाच्या कायदा विभागात अरुषी दीक्षितच्या यशामुळे शहरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, कायदा शिक्षणात गुणवंत विद्यार्थी घडविण्याच्या परंपरेत भर पडली आहे.