नागपूर : नागपूर शहराने एक मोठा टप्पा गाठला आहे. देशातील पहिला ई-पासपोर्ट नागपूरात जारी करण्यात आला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी भिषन गुरखा यांनी सांगितले की, या नव्या प्रणालीमुळे प्रवासाची सुरक्षा मजबूत होईल तसेच इमिग्रेशन तपासणी अधिक जलद पार पडेल.
ई-पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा?
ई-पासपोर्टसाठी अर्ज प्रक्रिया साध्या पासपोर्टप्रमाणेच असेल. पासपोर्ट सेवा पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जदारांना बायोमेट्रिक माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. तपासणीनंतर ई-पासपोर्ट जारी केला जाईल.
इतर शहरांतही लवकरच सुविधा-
सध्या नागपूरातून ई-पासपोर्टची सुरुवात झाली आहे. लवकरच ही सेवा मुंबई, दिल्ली, हैदराबाद, सुरत, बेंगळुरू, पुणे आणि चेन्नईसह देशातील प्रमुख शहरांत उपलब्ध होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, या उपक्रमामुळे भारतीय नागरिकांचा आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहे.