नवी दिल्ली : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरी करणाऱ्यांना आडोसा देत आहेत, असा त्यांनी थेट आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत विरोधक, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक मतदारांची नावे योजनाबद्ध पद्धतीने हटवली जातात. यावेळी तर त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ही संगनमताने केलेली मतचोरी आहे.”
कर्नाटकातील आळंद प्रकरण चर्चेत-
गांधी यांनी सांगितले की कर्नाटकमधील आळंद विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे गुपचूप वगळण्यात आली. एका बूथ लेव्हल ऑफिसरच्या नातेवाईकाचं नाव यादीतून गायब झाल्यानंतर चौकशी झाली आणि ६ हजारांहून अधिक मतदारांची नावे डिलिट झाल्याचे समोर आले.
या कारवाईसाठी इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरले गेले होते. अर्जदारांचे IP अॅड्रेस संशयास्पद निघाले. “गोदाबाई नावाच्या महिलेच्या नावाने १२ जणांचे अर्ज टाकले गेले आणि तिला त्याची माहितीही नव्हती,” असे गांधी म्हणाले.
लोकांना स्टेजवर आणून मांडले पुरावे-
यावेळी राहुल गांधींनी सूर्यकांत नावाच्या व्यक्तीला व्यासपीठावर बोलावले. त्यांच्या मोबाईल नंबरवरून फक्त १४ मिनिटांत १२ मतदारांची नावे हटवली गेली होती. मात्र सूर्यकांत यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांनी असा कोणताही अर्ज केला नाही. “काही अर्ज तर पहाटे ४ वाजता भरले गेले होते. यावरून आयोगाची भूमिका किती संशयास्पद आहे, हे दिसून येते,” असा सवाल राहुल गांधींनी केला.
सीआयडीच्या पत्रांकडे आयोगाचं दुर्लक्ष-
या प्रकरणाची तपासणी सध्या कर्नाटक सीआयडी करत असून, त्यांनी निवडणूक आयोगाला तब्बल १८ पत्रं पाठवली आहेत. तरीही कोणतंही उत्तर मिळालेलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. “मोबाईल नंबर कोणाचे होते, ओटीपी कुठून आले, लोकेशन काय होतं, याचा मागोवा घेणं आयोगाचं कर्तव्य होतं. पण ते मुद्दाम गप्प आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.










