
फडणवीस म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा झेंडा नक्की फडकणार असून महापौरपदही महायुतीचाच असेल. काहीही झाले तरी सत्ता मुंबईत बदलणार आहे.”
भाजपची सभा आणि उपस्थित मान्यवर-
वरळी येथील डोम सभागृहात मुंबई भाजप प्रदेशतर्फे ‘विजयी संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर आदी मान्यवरांसह मुंबईतील अनेक आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.
सामान्य कार्यकर्ता महापौर-
मुंबईच्या महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप करत फडणवीस म्हणाले,
“त्या काळात रुग्णांना बेड-ऑक्सिजन मिळत नव्हता, पण हजारो कोटींचा घोटाळा करण्यात आला. निवडणुकीच्या वेळी हे कफनचोर कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार?”
ते पुढे म्हणाले, “मुंबईच्या विकासाबद्दल उद्धव ठाकरे यांनी १०० भाषणांत बोललं असेल, तर मी १०० रुपये देण्यास तयार आहे. मुंबईने देशाला आणि जगाला भरभरून दिलं आहे, आता तिच्या विकासाची वेळ आली आहे. धारावीचा विकास बीडीडी चाळीसारखा करून दहा लाख लोकांना तिथेच घरे देण्यात येणार आहेत.”
परदेशी राजदूतांची उपस्थिती-
या मेळाव्याला विशेष म्हणजे ब्रिटन, सिंगापूर आणि आयर्लंडचे राजदूत हजर होते. यामुळे कार्यक्रमाला वेगळं महत्त्व लाभलं.
भाजपची ताकद ट्रेलरमध्ये नाही- सभेत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, काही पक्षांना सभा भरवण्यासाठी टीझर किंवा ट्रेलर दाखवावा लागतो. पण भाजपकडे अशी गरज नाही. अध्यक्षांनी फक्त एक टिचकी मारली तरी एवढी भव्य सभा उभी राहते. हेच मुंबईच्या खऱ्या आवाजाचं दर्शन घडवतं.प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संघटनशक्ती एकत्र ठेवण्याचं आवाहन केलं.










