नागपूर : धरमपेठ परिसरातील ज्ञानयोगी जिचकर पूल शनिवारी (१२ सप्टेंबर) मोठ्या जल्लोषात व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आला. मात्र, दुसऱ्याच दिवशी हा पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याने नागपूरकरांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी, फटाके, बॅनरबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण होते. मात्र, आज (रविवार, १३ सप्टेंबर) सकाळपासून पुलावर प्रवेश बंद करण्यात आला.
नागरिकांमध्ये नाराजी-
अचानक पूल बंद झाल्याने नागरिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे की उद्घाटनाची एवढी घाई नेमकी का केली? जर पुलाचे सर्व तांत्रिक काम पूर्ण झालेले नसेल, तर उद्घाटन सोहळ्याचा एवढा दिखावा करण्याची गरज काय होती, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
काही नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत “आम्हाला फक्त फित कापण्याचा कार्यक्रम दाखवायचा होता का?” असा टोलाही लगावला.
अधिकाऱ्यांकडून मौन-
पूल का बंद करण्यात आला याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने पूल वापरासाठी खुला करण्यात आलेला नसल्याची चर्चा आहे.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल-
विरोधकांनीही या प्रकारावर सरकारवर निशाणा साधला आहे. “नागरिकांचा पैसा खर्च करून अधुरी कामं उद्घाटनासाठी उघडणं म्हणजे सरळसरळ जनतेची फसवणूक आहे” असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
पुढे काय?
नागपूरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल महत्त्वाचा मानला जात होता. मात्र उद्घाटनानंतरच बंद झाल्याने नागपूरकरांना दिलासा मिळण्याऐवजी संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता प्रशासन पूल कधीपर्यंत खुला करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.