नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव चांगलाच वाढला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या पार्श्वभूमीवर आशिया कप 2025 मधील 14 सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून, त्यामुळे ऐतिहासिक लढतीला हिरवा कंदील मिळाला आहे.
याचिकेवर सुनावणीस नकार-
उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, पहलगाम हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानविरुद्ध सामना घेणे हा राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि जनभावनांच्या विरोधात आहे. मात्र, न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.
न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले – “यात इतकी घाई करण्यासारखं काय आहे? सामना रविवारी आहे. आम्ही यात काय करणार? सामना होऊ द्या, मॅच झाली पाहिजे.” त्यामुळे याचिकाकर्त्यांची मागणी धुळीस मिळाली.
काय होता याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद?
पहलगाम दहशतवादी हल्ला: भारतीय जवान शहीद झाले.
ऑपरेशन सिंदूर: भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली.
अशा परिस्थितीत क्रिकेट सामना आयोजित करणे म्हणजे शहीदांचा अपमान आणि चुकीचा संदेश देणे.
सामना आता ठरल्याप्रमाणे-
न्यायालयाच्या या निर्णयामुळे 14 सप्टेंबर रोजी दुबईत भारत–पाक संघ आमनेसामने येणार हे निश्चित झाले आहे. दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही लढत अधिकच धामधुमीत पार पडणार असून, संपूर्ण जगाचे डोळे या सामन्याकडे लागलेले आहेत.