नागपूर : मुस्लिम बांधवांमध्ये आज ‘ईद-ए-मिलादुन्नबी’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी मशिदी, मदरसे आणि चौकांमध्ये सजावट करण्यात आली. हिरव्या झेंड्यांनी, रोषणाईने आणि घोषणाबाजीने वातावरण भारावून गेले.
ईद-ए-मिलादुन्नबीला “ईद” म्हटलं जात असलं तरी या दिवशी ‘ईदची विशेष नमाज अदा केली जात नाही.त्याऐवजी मुस्लिम समाज कुरआन पठण, पैगंबरांच्या जीवनातील शिकवणींचे वाचन, दुआ आणि जुलूस यांद्वारे हा दिवस साजरा करतो.
नागपुरात सकाळपासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. गांधीबाग, मोमिनपूरा, इमामवाडा, कोतवाली परिसर याठिकाणी विशेष सजावट करून मशिदींमध्ये कार्यक्रम झाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून जुलूस काढण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, नात-ए-शरीफच्या स्वरात आणि पैगंबरांच्या संदेशांचा प्रचार करत हा जलूस निघाला.
धर्मगुरूंनी या प्रसंगी पैगंबरांच्या शिकवणीना भर दिला. इस्लाममध्ये खरी ईद फक्त ईद-उल-फितर आणि ईद-उल-अजहा असल्याचे सांगितले. मात्र पैगंबरांवरील प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी ईद-ए-मिलादुन्नबी साजरी केली जाते, असे स्पष्ट करण्यात आले. नागपुरात आजचा दिवस श्रद्धा, उत्साह आणि एकोपा यांचा संगम ठरला. मुस्लिम बांधवांनी आपापसात गोडधोड वाटून, समाजात शांती आणि सौहार्दाचा संदेश दिला.









