
मुंबई: उच्च न्यायालयाने आंदोलकांनी अडवलेल्या रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून ते तत्काळ मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार न्यायालयीन सूचनांचे काटेकोर पालन करेल, असे स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन केवळ आझाद मैदानापुरते मर्यादित राहावे, अन्यत्र गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यांनी मुंबईकडे येणाऱ्या इतर आंदोलनकर्त्यांनाही रोखण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “माझ्या माहितीनुसार जरांगे-पाटील यांना काही अटींवर उपोषण करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्या अटींचे उल्लंघन झाले आहे. विशेषतः रस्त्यांवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार आता न्यायालयाच्या सूचनांचे पालन करणार आहे.”
यावेळी त्यांनी आंदोलनादरम्यान घडलेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवला. “पत्रकार आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर, विशेषतः महिला पत्रकारांवर हल्ले होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. अशा घटनांचा निषेध सर्वांनी केला पाहिजे,” असे फडणवीसांनी ठामपणे सांगितले.
व्यापाऱ्यांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा आंदोलनकर्त्याने दुकाने बंद करण्याचे आदेश दिले नव्हते. नंतर पोलिस सुरक्षा दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली आणि ती सध्या सुरूच आहेत,” असे त्यांनी सांगितले.
सरकार आंदोलनाचा कायदेशीर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असून शांततेत मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले.








