नागपूर : शहरातील अंमली पदार्थ व्यापाराविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर- लेट्स युनाईट फॉर अ ड्रग-फ्री सोसायटी’ मोहिमेखाली नागपूर क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी उशिरा रात्री मोठी कारवाई केली. वाठोडा परिसरातील श्रावण नगरातून २४ वर्षीय युवकाला ५५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पावडरसह रंगेहाथ पकडण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत तब्बल ८ लाख ३७ हजार रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.
कसा उघड झाला गुन्हा?
२७ ऑगस्टच्या रात्री १० ते ११.४५ वाजता दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाला वाठोडा येथील जय बजरंग किराणा स्टोअरजवळील संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. स्वामी नारायण मंदिरामागे संशयित युवक उभा असल्याची खबर मिळताच पथकाने सापळा रचून छापा टाकला.
तेथे उभ्या असलेल्या तरुणाने आपले नाव सूरज भीम कोसरे (२४, रा. श्रावण नगर, वाठोडा) असे सांगितले. झिप-लॉक पिशवीत ठेवलेली ५५ ग्रॅम एमडी पावडर त्याच्याकडून जप्त करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी मोबाईल फोन, हुंडई व्हर्ना कार, दुचाकी यासह एकूण ८ लाख ३७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फरार साथीदाराचा शोध सुरू-
चौकशीत कोसरेने कबूल केले की, त्याला अंमली पदार्थ त्याचा साथीदार आशिष दिलीप काले (३२, रा. चैतन्येश्वर नगर, वाठोडा रोड) याच्या मदतीने मिळाले. सध्या काले फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. कोसरे हे अंमली पदार्थ विक्रीसाठी आणत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात वाठोडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई-
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, संयुक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (क्राईम ब्रँच) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाणे, पोलीस उपनिरीक्षक नागेश पुनवाड, तसेच पोलीस शिपाई पवन गजबिये, अरविंद गेडेकर, विवेक अडहू, मनोज नेवरे, अनुप यादव आणि राहुल पाटील यांचा समावेश होता.