नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतात. माझ्यावर आमदारकीची जबाबदारी सोपविताना दिव्यांग आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जबाबदारी सोपविली आहे. भविष्यात आपला कुठलाही प्रश्न शासन दरबारी प्रलंबित राहणार नाही, याची काळजी तुमचा पालक म्हणून घेईन, असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी दिव्यांग मुलांना दिला.
निमित्त होते कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘सच्चे मोती – उत्सव आपुलकीचा’ या उपक्रमाचे. आ. संदीप जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग संस्था व शाळांच्या वतीने हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. आमदार जोशी यांचा विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठा केक कापून त्यांच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थाने दिव्यांग विद्यार्थ्यांनीच हा वाढदिवस आपल्या गोड हसण्यातून व आनंदमयी उपस्थितीत संस्मरणीय केला.
या प्रसंगी आमदार जोशी यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा कार्यक्रमातील सर्वात मोठा पुरस्कार ठरला. याचवेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऑर्केस्ट्राने प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यांच्या गायनातील जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आ. संदीप जोशी यांनी सांगितले की, दिव्यांग मुले ही देवाने दिलेली खरी रत्ने आहेत. त्यांच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी मी सदैव पाठीशी उभा राहीन. नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही दिव्यांग शाळेचा प्रश्न प्रलंबित राहणार नाही, याची मी हमी देतो, असेही ते म्हणाले.
या वेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचे अधिकारी, दिव्यांग शाळांचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘सच्चे मोती – उत्सव आपुलकीचा’ या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद, शिक्षण आणि प्रेरणेचा किरण फुलवण्याचा प्रयत्न झाला.