मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने नागपूर-गोंदिया अॅक्सेस कंट्रोल्ड सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील दिला आहे. हा हाय-स्पीड एक्सप्रेसवे सुमारे 127 ते 163 किमी लांबीचा असून, नागपूर जिल्ह्यातील गावसी (बाह्य वळण मार्गाजवळ) येथून सुरू होऊन गोंदिया जिल्ह्यातील सावरी गावापर्यंत जाणार आहे. या मार्गात 13.7 किमीचा गोंदिया बायपास तसेच 3.8 किमीचा तिरोडा कनेक्टर समाविष्ट करण्यात आला आहे.
सध्या नागपूर ते गोंदिया प्रवासासाठी साडेतीन ते पाच तासांचा कालावधी लागतो. मात्र, या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून तो वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे. प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १२ हजार कोटी ते २१ हजार ६७० कोटी रुपये इतकी असून, ३० महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने NG-01 ते NG-04 अशा विविध करारांना मान्यता दिली असून अफकॉन्स, पटेल इन्फ्रा आणि एनसीसी या आघाडीच्या कंपन्या काम पाहणार आहेत.
हा एक्सप्रेसवे नागपूरला गोंदिया, भंडारा आणि तिरोडा या औद्योगिक केंद्रांशी थेट जोडणार आहे. त्यामुळे व्यापार, शेती, शिक्षण व आरोग्यसेवा क्षेत्रांना मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय, हा मार्ग समृद्धी महामार्गाशी सरळ जोडला जाणार असल्याने विदर्भातील अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे.
राज्य सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करणार नाही, तर प्रादेशिक रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा व आर्थिक घडामोडींना गती देणार आहे. पूर्व विदर्भाच्या सततच्या विकासासाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.