नागपूर : पारशिवनी तालुक्यातील पालोरा रेती घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात पारशिवनी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल १ कोटी ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज गदादे यांच्या नेतृत्वाखाली पेंच नदीलगत पालोरा घाटावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन ट्रक, पोस्क्लेन मशीन, जेसीबी, मोबाईल व तब्बल १४० ब्रास रेती असा मोठा माल हस्तगत करण्यात आला.
या अवैध रेती उत्खनन प्रकरणामागील सूत्रधार कमर अहमद सिद्दीकी आणि तबरेज अहमद सिद्दीकी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी निकेश नारायण सिंह, अमित देशमुख, मोहम्मद कमर ताजुद्दीन खान, राजेंद्र शेंडे व सुजाद अहमद सिद्दीकी या पाच जणांना अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचवरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व पंचनामा केला. या धडक कारवाईमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.