मुंबई : लाखो चाहत्यांच्या प्रचंड उत्सुकतेनंतर बिग बॉस 19चा भव्य प्रारंभ झाला. सलमान खानने या हंगामातील सोळा स्पर्धकांची ओळख करून दिली आणि त्याच क्षणी प्रेक्षकांचा उत्साह दुपटीने वाढला. नव्या नियमांसह आणि भन्नाट ट्विस्टसह या सीझनमध्ये हशा, वाद, प्रेमकथा आणि कटकारस्थानांचा मेळा रंगणार आहे.
विविध क्षेत्रांतून आलेल्या कलाकारांनी घरात पाऊल टाकलं आहे. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते मराठी कॉमेडियन प्रणित मोरेने. आपल्या खास विनोदी स्टाईलमध्ये त्याने प्रवेश करताच घराचा माहोल रंगतदार केला. भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीनेही आपल्या दमदार नृत्याने प्रीमियर शो गाजवला आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
पुढील काही महिन्यांत या सोळा सदस्यांची कहाणी, नात्यांचे उतार-चढाव, संघर्ष, मजा आणि नाट्यपूर्ण क्षणांचा अखंड डोस प्रेक्षकांना दररोज मिळणार आहे. बिग बॉसचा हा नवा सीझन खऱ्या अर्थाने मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.