नागपूर : शहरातील इनर रिंगरोडवर स्वावलंबी नगर (Swablambi Nagar) ते पडोले चौक (Padole Chowk) या भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कायम होती. मात्र, आता मनपा (Nagpur Municipal Corporation) या ठिकाणी अंडरग्राउंड बॉक्स पद्धतीने साचलेले पाणी थेट शास्त्री नगर (Shashtrinagar) येथील नाल्यात सोडणार आहे. सोमवारी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (Dr. Abhijit Choudhary) यांनी या भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्याचे आणि वेगाने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
जुनाट समस्येवर उपाय-
दक्षिण-पश्चिम नागपूरातील स्वावलंबी नगरातील राधे मंगल कार्यालयापासून पडोले हॉस्पिटल चौकापर्यंत प्रत्येक पावसात रिंगरोड तळ्यात रूपांतरित होत असे. गुडघ्यापर्यंत पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पेट्रोल पंपासह रस्त्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची वेळ येत असे. नागरिकांकडून अनेक वर्षांपासून या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी होत होती. शेवटी मनपाने ठोस पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड किलोमीटर ड्रेनेज लाईन-
नवीन योजनेनुसार, ब्लॉकेज होणाऱ्या ठिकाणावरून थेट शास्त्री नगर नाल्यापर्यंत सुमारे दीड किलोमीटर लांबीची अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी आधीपासून असलेल्या ड्रेनेज लाईन, टेलिफोन लाईन आणि वीजवाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार आहेत.
आयुक्तांचे निर्देश-
निरीक्षणावेळी डॉ. चौधरी यांनी मनपाच्या जलवाहिनी, ड्रेनेज व दूरसंचार विभागाच्या कामांचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत सुरू करून नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, कामाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.