नागपूर : रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या श्वानांच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर नागपूर महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. शहरात चालू असलेल्या एबीसी (Animal Birth Control) कॅम्पची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मनपा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली.
सध्या शहरात भांडेवाडी, गोरेवाडा आणि महाराजबाग येथे एबीसी कॅम्प कार्यरत आहेत. मात्र, नसबंदी प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि रेबीज नियंत्रणासाठी आणखी सुविधा उभारण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयासोबत सहकार्य घेण्याचा निर्णय झाला. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जागरूकता मोहीम राबवली जाणार आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्यांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात येणार असून, कुत्र्याने चावा घेतलेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय मदत व रेबीज लस मिळावी यासाठी यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश पंत यांनी दिले.
तसेच, पाळीव कुत्र्यांचे पंजीकरण वाढवण्यावरही भर देण्यात आला आहे. विद्यमान कॅम्पच्या प्रगतीचा मासिक अहवाल एमएसयूच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.