नागपूर: लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जून २०२५ मध्ये मनपाने १६ कंत्राटी बालवाडी शिक्षकांची भरती केली होती. त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना देण्यासाठी १८ ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत पाच दिवसांच्या ‘इंडक्शन बूटकॅम्प’ चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शिक्षकांच्या सातत्यपूर्ण शिक्षण प्रवासाची सुरुवात असून, यापुढे दर महिन्याला त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.
या बूटकॅम्पदरम्यान मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांनी नवनियुक्त शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचे अनुभव ऐकून घेतले आणि मनपाच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांनी समर्पण भावनेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांनी शिक्षकांना अध्यापनामध्ये उच्च मापदंड प्रस्थापित करण्याकरिता प्रोत्साहित केले.
बूटकॅम्पचा मुख्य उद्देश शिक्षकांना एक मजबूत शैक्षणिक दृष्टीकोन, पायाभूत ज्ञान आणि प्रभावी वर्ग व्यवस्थापनाची कौशल्ये देणे हा होता. या प्रशिक्षण शिबिरात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यात विशेषतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बी.आर.आंबेडकर, महात्मा गांधी, जॉन ड्यूई आणि जे. कृष्णमूर्ती यांसारख्या विचारवंतांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अभ्यास, त्यांच्या विचारांना ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२०’ आणि राज्य/राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांशी कसे जोडता येईल, यावर भर देण्यात आला. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठीचे अभ्यासक्रम, क्षमता आणि अपेक्षित शैक्षणिक निष्पत्ती यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना सक्रिय आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी वर्गखोल्यात ‘लर्निंग स्टेशन्स’ कसे तयार करावेत यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रभावी वर्ग व्यवस्थापनासाठी दिनचर्या, नियमावली आणि शिस्तीचे पालन कसे करावे, याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिक्षकांनी ‘द आकांक्षा फाऊंडेशन’ च्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या मनपाच्या तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना भेटी देऊन प्रत्यक्ष वर्गातील कामकाजाचे निरीक्षण केले. नागपूर मनपाचा हा उपक्रम पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी एक मजबूत पाया तयार करण्याची आणि आपल्या शाळांमधून आत्मविश्वासू, सक्षम आणि जिज्ञासू विद्यार्थी घडवण्याची कटिबद्धता दर्शवतो.