नागपूर : बेसा-पिपळा मार्गावरील सुरू असलेले रस्ते बांधकाम संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अथर्व नगरी ७ गार्डन होम्स परिसरातील रहिवाशांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
दररोज शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका सतत वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
याचबरोबर, मोक्षधाम (दहनघाट) रोड, बेसा-पिपळा येथील रस्त्यांची स्थितीही अत्यंत वाईट असून स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. “वाहन चालवताना संतुलन राखणं कठीण होत आहे. रस्त्यामुळे दैनंदिन प्रवास संकटमय झाला आहे,” असे रहिवाशांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने कामाला गती देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.